शेलारमामांचे मोक्ष गुरू परमहंस श्री कपिल महाराज!

फेसबुकमुळे जुने अध्यात्मिक स्नेही कृष्णा शेलार म्हणजे शेलार मामांची भेट अठ्ठावीस वर्षांनी झाली. ९४-९५ मध्ये आमच्या ज्या अल्पकाळ भेटी झाल्या त्यावेळी मला श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयांनी नुकतेच बोट धरून त्यांच्या कडे ओढले होते. पण त्यावेळी मामा त्यांच्या अध्यात्मिक प्रवासात खूप पुढे सरकलेले होते. किती व कशाच्या जोरावर याची मला कल्पना नव्हती किंबहुना तो आयाम त्यावेळी मला नव्हता. आता मागील महिन्यात मामांचा नंबर मिळाला व भरपूर, मनसोक्त बोलणं सुरु झालं. बोलण्याच्या ओघात मामांनी त्यांना भेटलेल्या गुरू, सतगुरू व मोक्ष गुरू बद्दल काही कल्पना दिली. मामांचे गुरू हे गडहिंग्लज जवळील सामानगडावरील श्री यशवंत महाराज गावडे भोसले. तर सतगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. आणि मोक्ष गुरू श्री कपिल महाराज! मामांच्या बोलण्यात फोनवर कपिल महाराजांबद्दल जे समजले त्यावरून लगेच त्यावर लिहावे अशी उर्मी आल्याने मी मामांना तसा मेसेज केला की लिहू का! त्यावर मामांचा फोन आला की थांबा, आपली प्रत्यक्ष भेट होऊदे, कपिल महाराजांबद्दल सविस्तर सांगतो मग लिहा.

पंधरा दिवसांत भेटीचा योग आला व तोही सलग पाच दिवस आणि लोकसंपर्कापासून दूर सामानगडावर, ओंकार पठारावर सलग पाच दिवस, चोवीस तास मामांचा सहवास लाभला. त्यात सुर्योदयाच्या अर्धा तास आधीपासून ते थेट रात्री उशिरापर्यंत मामा अव्याहतपणे अध्यात्मिक धुंदीत बोलत राहिले. सकाळी पटकन पोह्यांचा नाष्टा, दुपारी व रात्री वरणभात करणे व मधल्या वेळेत ओंकार पठारावरील प्रभू श्रीरामचंद्रांच्या पाऊलखुणा एक एक करून दाखवत ज्ञानाची, अनुभूतीची व त्यानुसार आलेल्या अनुभवांची ज्ञानगंगा मामांमधून प्रसवत होती. विषयांची यादी होतीच. त्यातील एक विषय म्हणजे मोक्ष गुरू परमहंस श्री कपिल महाराज! कपिल महाराजांचं पूर्ण नाव आलम पूर्णसुधाकर रेड्डी व गाव आंध्रप्रदेशातील गुंटूर. जन्मसाल १९४६. पाच भावंडांमधील ते शेंडेफळ. हिब्रू भाषेसह जगातील चौदा भाषेंचे जाणकार. उच्च शिक्षणासह आंध्रप्रदेशातील पाटबंधारे खात्यात नोकरी लागली. पण मन रमेना म्हणून ती नोकरी सोडली. यु पी एस सी तून भारतीय वन सेवेत (आय एफ् एस्) मध्ये सिलेक्शन झाले. परंतू पहिलं पोस्टींग आसाम बॉर्डरवर झाल्याने घरच्यांनी सोडले नाही. त्यादरम्यान बायबल, कुराणासह सर्व धर्मग्रंथांचं सार कोळून पिताना रामकृष्ण परमहंसांचा अभ्यास करताना कपिल महाराजांना परमहंस अवस्था प्राप्त झाली. सिलेक्शन, नोकरी, पोस्टींग सगळं बाजूला राहिले व घरातील लोकांना वाटले की याला वेड लागले. मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. कपिल महाराजांनी डॉक्टरांना सांगितले की मी वेडा नाही अथवा मानसिक रुग्ण देखील नाही. माझ्या कडे येणारा प्रत्येक रुग्ण तो वेडा नाही असेच सांगतो असे म्हणून डॉक्टरांनी कपिल महाराजांच्या मेंदूला इलेक्ट्रीकल शॉक्स द्यायला सुरुवात केली. महाराज डॉक्टरांना म्हणाले की मी नाही तर तूच वेडा आहेस. घरचेही कोणी महाराजांना समजून घेईनात. तेंव्हा रात्री महाराजांनी मेंटल हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर उडी मारली व घरादाराचा व गुंटूरचा कायमस्वरूपी त्याग करत तडक महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली. महाराजांनी घर सोडले त्यावेळी त्यांच्या घरावर लागोपाठ संकटं आली व २५ एकर जमीनीपैकी थोडी थोडी करत २३ एकर शेती विकली गेली व खाण्यापिण्याचेही वांधे झाले. महाराजांना वेडा म्हणून घोषित करणारा डॉक्टर देखील एका महिन्यात वेडा झाला.

महाराज मजल दर मजल करत १९७७ साली कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज येथे पोहोचले व येथील महादेव मंदिरात दिपमाळेच्या ओट्यावर स्वामी समर्थ एक हाताचा आधार डोक्याला देत तशा मुद्रेत सदोदित येऊन थांबले. त्यावेळी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेल्या कपिल देवचा बोलबाला होता व तरुण अवस्थेतील उंचेपूरे सावळे कपिल देव सारखे दिसत. म्हणून गडहिंग्लज मधील लोक महाराजांना कपिल म्हणायला लागले. महाराज निवडक दहा घरातून एखाद्या घरी करतल भिक्षा मागत अन्यथा एका भज्यांच्या हातगाडी जवळ फेकून दिलेल्या उच्छीष्टावर भूक भागवत. या दरम्यान शेलारमामा अहमदनगर जिल्ह्यात सरकारी नोकरीत होते. परंतु अधनंमधनं गावी गडहिंग्लज येथे जाणं होई. १९८७ साली मामा गडहिंग्लज येथे आले असताना पहाटेच्या अंधारात टिमकी (छोटा डमरू) वाजवित गाव जागवणाऱ्या कुडमुड्या ज्योतिषाचा आवाज दुर वरून ऐकू येत होता. मामांनी मनोमन भावना केली की तो टिमकीचा आवाज माझ्या दिशेने येत आहे. आणि खरोखरच काही वेळात तो आवाज जवळ येत येत मामांच्या दारात आला. मामांनी दार उघडले व दहा रुपये दक्षिणा देत त्या ज्योतिषाच्या पायावर श्रद्धेने डोकं टेकवले. त्याक्षणी ज्योतिष म्हणाला की दोन दिवसांत तुमचा गुरू तुम्हाला भेटणार आहे. मामा सकाळी महादेवाच्या दर्शनाला मंदिरात गेले तर दिपमाळेच्या कट्ट्यावर महाराजांचे दर्शन व नजरानजर झाली.

हेच आपले गुरू अशी कपिल महाराजांना पाहताच मामांची मनोमन खात्री झाली. महाराजांनी घरी घेऊन जाण्यासाठी मामांनी भाड्याची जीप गाडीची सोय केली. महाराजांची अवस्था पाहून जीप वाल्याने महाराजांना गाडीत घ्यायला नकार दिला, गाडीचे सीट खराब होतील म्हणून. मामा म्हणाले की मी तुझे सीट कव्हर बदलून देतो. असं करत मामांनी महाराजांना घरी नेले. लगेच दोन जोड कपडे आणले. पण रजा संपल्याने नगरला परतायचं होतं. महाराजांच्या खाण्यापिण्याची सोय करुन मामा नगरला परतले खरे पण जीवाची घालमेल सुरू झाली. आपल्या मागे महाराजांची सेवा व्यवस्थित होईल का ही चिंता लागली. मग मामांनी महाराजांना नगरलाच आणले व तेथून जिथे जिथे बदली झाली तिथे तिथे महाराजांना घरातील वरिष्ठ सदस्यासारखं बरोबर ठेवलं. घरात मंडळींना मामांनी कल्पना दिली की हे आता कायम आपल्या सोबत राहणार आहेत. महाराज कायम समाधी अवस्थेत व मौन धारण करून असल्याने अगदी लहान बाळासारखं शी शू सर्व जागेवर असे. अवधूताची सेवा सोपी नसते.
परंतु घरातील सर्वांनी महाराजांना मनापासून स्विकारले होते. मामांनी घरात सांगून ठेवले होते की आता माझं आयुष्य महाराजांसोबत बांधलं आहे. त्यामुळे कुणाची हरकत असल्यास माझा निम्मा पगार मी लगेच देईल पण गुरुला सोडणार नाही.

महाराजांचे इंग्लिश लिखाण उत्कृष्ट होते. विचारणा केली तेव्हा त्यांनी त्यांच्या गावचा पत्ता लिहून दिला. मामांनी त्यांच्या घरी पत्र पाठवून महाराज माझ्याकडे सुखरूप आहेत असे कळवून एकदा येऊन पाहण्यासाठी वाटखर्चही पाठवला. महाराजांचा मोठा भाऊ आला.
त्यांनाही कुणाला अशा अवस्थेतील महाराज स्वतःकडे नकोच होते याची कल्पना मामांना होती. तरीही मामांनी भावाला सांगितले की महाराजांना विचारा की तुम्ही येथे खुश आहेत का? त्यावर महाराजांनी तेलगूत भावाला लिहून दिले की “त्याने (मामांनी) मला व मी त्याला ओळखले आहे, आता मला कुठेही जायचे नाही.”

लोकांच्या मागण्यांचा महाराजांना उपद्रव होऊ नये म्हणून मामांनी पहिल्या पासून महाराजांबद्दल शक्यतो कुणालाही स्वतःहून सांगितले नाही. कारण ते सदोदित त्यांच्या आनंदात मग्न असत. २०१६ साली मामा शासकीय सेवेतून निवृत्त झाले व गडहिंग्लज येथे घरी वास्तव्यास आले. २०१८ मध्ये महाराजांनी अचानक खाणेपिणे कमी कमी करत नेले व अश्विनात अन्नपाणी पूर्ण व्यर्ज केले. कोजागिरी पौर्णिमेला महाराजांचा संकल्प मामांच्या लक्षात आला. मामा व त्यांच्या पत्नी आळीपाळीने महाराजांजवळ बसून होत्या. रात्री बारा वाजता महाराजांनी दोघांच्याही पायांवर हात ठेवून नमस्कार केला व आयुष्यभर केलेल्या सेवेची कृतज्ञता व्यक्त केली व सुखासन घालून खेचरी मुद्रा लावली. अवकाशाकडे एकटक नजर लावून महाराजांनी देह सोडला!

जगाला अवधूताची दृश्य कृपा समजावी म्हणून की काय मामांची मोठी कन्या आज कोल्हापुरात विद्यापीठात प्राध्यापक आहे. आम्ही गेलो त्यावेळी तिला कोलंबोत कॉन्फरन्स साठी जाण्याची लगबग होती.दुसरी कन्या डॉक्टर होऊन आज पुण्यात एम् डी करत आहे. एकाच वेळी चार फॅकल्टी मध्ये तिचं सिलेक्शन झाले होते. तिलाच प्रश्न पडला की काय निवडावे. मुलगा कंपुटर इंजिनिअर असून पुण्यात नामांकित कंपनीत आहे. जावई, सुन, नातवंडांनी मामांचा वटवृक्ष अवधूत कृपेने बहरला आहे. मामांच्या कार्यात सर्व अगदी तनमनधनाने समर्पित आहेत. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी मुलगा, सुन, मुली, जावई व सर्व नातवंडे गडावर मुक्कामास होती.

सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज, पिठापूर यांचा फोटो पाहून मामांच्या घरातील सर्वच म्हणतात की गोपाल बाबा महाराज व कपिल महाराज भाऊ भाऊ आहेत की काय! इतकं साम्य दिसण्यात, शरीरयष्टीत, अवस्थेत, लीलेत, आणि खाणपानात व आवडीनिवडीत.


-हिराचंद गोपालचंद कोठारे

Posted in Uncategorized.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *