अक्षय ऊर्जा यंत्राची (शिवलिंग चौसष्टी) प्राणप्रतिष्ठापना – 7 May 2019

महाशिवरात्री चा परमपवित्र दिवस, सोमवार दि. 4 मार्च 2019, पुण्याहून सकाळी 7 वाजता श्री ढेकणे परिवारासह सामानगड येथे जाण्यासाठी निघालो. दुपारी  संकेश्वर येथून गडहिंग्लज कडे आमची गाडी वळाली, थोड्याच वेळात आम्ही गडहिंग्लजच्या परिसरात पोहचलो आणि परम सद्गुरू महावतार श्री बाबाजींच्या कृपेने अचानक मनात विचार आला ….. चौसष्ठ ज्योतिर्लिंग… बुद्धीबळाची चौसष्ठ घरे!

बुद्धिबळाच्या चौसष्ठ घरांचे एक अदभुत वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घरातील संख्या जर दुप्पट गतीने वाढली तर चौसष्ठव्या घरातील संख्या अगणित (Infinity) होते, उदा. पहिल्या घरात 1, दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 4 चौथ्या घरात 8 पाचव्या घरात 16 अशी संख्या वाढत गेली तर शेवटच्या चौसष्ठव्या घरात ती संख्या अगणित होते.

चौसष्ठ चे महत्त्व

प्राचीन भारतीय वैदिक सनातन हिंदू धर्म जीवन पद्धती ही पुर्णपणे वैज्ञानिक जीवन पध्दती होती. हे वैज्ञानिक सत्य आजही पाश्चात्य जीवन पद्धतीचे अनुकरण आणि आक्रमण झाले असताना ही  अनुभवास येते.

या प्राचीन जीवन पद्धतीत चौसष्ठ ला खुपच धार्मिक, सामाजिक, तार्किक आणि वैज्ञानिक महत्व आहे. आपल्याकडे चौसष्ठ सिद्ध, चौसष्ठ योगिनी, चौसष्ठ कला चौसष्ठ ऋग्वेदातील ऋचा, चौसष्ठ ज्योतिर्लिंग आणि बुद्धिबळाच्या चौसष्ठ घरांचा विचार येतो अर्थातच ज्यामध्ये अनंतता (Infinity) आहे किंवा निर्माण होते त्याच्या मुळाशी
चौसष्ठ आणि त्याचे वर्गमुळ आठ आहे आता हे आठ म्हणजे काय तर पाच महाभूते (पंचमहाभूते – पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश) अधिक बुद्धीतत्व अधिक मनतत्व आणि अहं (अहंकार) अशी आठ तत्वे मिळून शेवटी नववे महातत्व सोहम (ओंकार) निर्माण होते.

गेली 2 हजार वर्षे जरी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग माहिती असली तरी प्राचीन भारतात (आर्यावर्त) 64 ज्योतिर्लिंग अस्तित्वात होती, ही ज्योतिर्लिंग केवळ एक शिव उपासना स्थान होती असे नसुन ही सर्व चौसष्ठ ज्योतिर्लिंग   विश्वकल्याणासाठी एक वैश्विक ऊर्जा निर्मिती आणि प्रसारीत करणारी ऊर्जाकेंद्र (Cosmic Power Generating and Transmitting Centers) होती.

या चौसष्ठ ज्योतिर्लिंग स्थाना मधून नित्य पूजाअर्चा, उपासना, साधना, ध्यान, यज्ञ, प्रार्थना, प्रयोग, संशोधन आदी विविध मार्गाने विश्वकल्याणासाठी अनुष्ठान चालत असे आणि त्या दिव्य ऊर्जाशक्तीचा परिणाम म्हणून तेव्हा भारत अजेय आणि समृध्द होता आणि संपूर्ण जग ज्ञान व समृद्धी प्राप्तीसाठी फक्त भारताकडेच येत होते.

काळाच्या ओघात हळूहळू या ज्योतिर्लिंग स्थानांचे महत्व क्षिण होत गेले आणि त्यातील सध्याची 12 ज्योतिर्लिंग स्थाने वगळता अन्य 52 ज्योतिर्लिंग स्थाने लुप्त झाली किंवा त्यांचे धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्व कमी होत गेले (कालाय तस्मय नम:) किंवा त्यापैकी काही स्थाने परधर्मीय आक्रमकांनी ताब्यात घेऊन त्याठिकाणी त्यांची धर्मस्थळं किंवा प्रार्थना स्थाने निर्माण केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड किल्ला आणि त्याच्या भोवतालचे संपुर्ण पठार हा निसर्ग निर्मित ओंकार आकार असलेले पठार आहे, Google वर शोधले असता ते आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. इसवीसनाच्या बाराव्या शतकात सन 1195 मध्ये दुसरा राजा भोज याने येथे किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते, तसेच समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट या गडावर झाल्याचे येथील जुने जाणते लोक आणि गडकऱ्यांचे वंशज सांगतात.
प्रत्यक्ष गडावर भवानी माता मंदिर, सात कमानी विहिर, अंधार कोठडी या वास्तू अद्यापही सुस्थितीत आहेत.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल च्या आख्यायिका येथील रहिवासी आत्मीयतेने सांगतात.

स्वातंत्र्य लढ्यातील आझाद हिंद फौजेचे एक सैनिक आणि आध्यात्मिक सत्पुरुष कै. यशवंतराव महाराज यांचे वास्तव्य या गडावर होते, ते आपल्या भक्त मंडळींना हे पठार निसर्ग निर्मित ओंकार असल्याचे सांगत असत. 1998 साली श्री. कृष्णा तुकाराम शेलार (के.टी. शेलार, सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर) यांनी त्या ओंकार आकाराच्या पठाराचा प्रत्यक्ष शोध घेतला आणि त्याचबरोबर त्या ओंकार पठाराच्या बाजुने असलेल्या गुहा, प्राचीन खुणेची ठिकाणे, प्राचीन ध्यानधारणा स्थाने यांचाही शोध लावला, हे शोध घेत असतानाच श्री. शेलारानी भूगर्भात तयार केलेल्या शिवमंदिराचा (रामाचा वाडा) शोध घेतला. कै. यशवंत महाराज आणि त्यांचे पश्चात त्यांचे शिष्य श्री. कृष्णा तुकाराम शेलार (के.टी. शेलार, सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर) गेली 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून या पठारावरील भूमिगत शिवमंदिर आणि आजूबाजूच्या परिसराची सुधारणा आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हे सर्व कार्य करत असताना श्री. कृष्णा तुकाराम शेलार (के.टी. शेलार, सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर) याना अनेक संकटे, मानहानी, उपेक्षा सहन करावी लागली, एवढेच काय समाजाने त्यांना वेडे ही ठरवले, हे ही खरेच आहे की कोणीतरी एखाद्या गोष्टीचे वेड लाऊन घेतल्या शिवाय ती गोष्ट सिद्ध आणि साध्य होत नाही.
या संदर्भातील माहिती www. omkarpathar. com
आणि
www. samangad. com
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या ओंकार पठारावर पूर्वजांनी निर्मिलेल्या अनेक खुणा आजही दिसतात. सिद्ध समाधी योग परिवाराचे संस्थापक कै. ऋषि प्रभाकर यांच्या सारखे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर योग व ध्यान साधनेसाठी येत असत. आजही अनेक साधक योग येथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात राहुन ध्यान साधना करतात आणि आत्मिक प्रगती साधतात.

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात सामान गड येथेही वैश्विक ऊर्जेची निर्मिती आणि प्रक्षेपण करणारे एक शिवज्योतिर्लिंग आहे, ज्याचा भौतीक विकास गेली 50 वर्षे प्रथम स्वर्गीय यशवंत महाराज यांनी आणि त्यांच्या नंतर सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर श्री कृष्णा तुकाराम शेलार (श्री. के. टी. शेलार) करत आहेत. सदर स्थान श्री महालिंगेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाते.

चार मार्चला महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या पवित्र शिवज्योतिर्लिंग दर्शनाला जात असताना परमगुरू महावतार श्री बाबाजींच्या कृपेने अचानक मनात विचार आला ….. चौसष्ठ ज्योतिर्लिंग… बुद्धीबळाची चौसष्ठ घरे! आणि मग विचार चक्र वेगाने फिरू लागली आणि ध्यानाच्या सखोल अवस्थेत सर्व उलगडा झाला …. नियतीला आता लुप्त झालेल्या बावन्न आणि प्रकट असलेल्या बारा अश्या चौसष्ठ ज्योतिर्लिंगांच्या दिव्य ऊर्जा स्थानांची पुन्हा एकदा विश्वकल्याणसाठी आवश्यकता निर्माण झाली आहे, त्यासाठी सर्व चौसष्ठ ज्योतिर्लिंग प्रतीक रुपात एकाच ठिकाणी एकाच पाषाणशिळेत निर्माण करून त्यापासून अगणित दिव्य वैश्विक ऊर्जा आकर्षित करून तिचे अनंतात (Infinity) रूपांतर करून ती दिव्य ईश्वरीय वैश्विक ऊर्जा ( Infinite Divine Cosmic Energy) या विश्वात (Universe) प्रक्षेपित करून सर्व चराचराचे विश्वकल्याण साध्य करायचे आहे.

आपल्या पूर्वजांना परमाणू पासून परमात्म्या पर्यंत सर्वच ज्ञात होते, म्हणूनच गौतम, कणाद, कपिल, अत्री, अगस्ति, विश्वामित्र, वशिष्ठ अश्या सर्वच सिद्ध आणि ऋषिंनी कायमच विश्वकल्याणसाठी वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यातुन मिळालेले फळ परत निसर्ग (सृष्टी) आणि समाजालाच अर्पण केले.

अगदी महर्षि कणादापासून (अणुरेणू, परमाणू पासून चिदाणु (अणूचा एक लाखावा भाग) पर्यंतचा शोध महर्षि कणाद यांनी लावला) ते अल्बर्ट आईन्स्टाईन (E=mc2) यांनी अखंड ऊर्जेचा सिद्धांत मांडला आहे.

या विश्वात सर्व काही ऊर्जेच्या (Energy) चैतन्य स्वरूपात सतत अस्तित्वात आहे, बदलते ते फक्त त्या ऊर्जेचे स्वरूप! जेव्हा ही ऊर्जा निर्गुण निराकार असते तेव्हा ती आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, परंतु तिचे अस्तित्व मात्र जाणवते (उदा. विजेचा शॉक बसल्यावर तिचे अस्तित्व समजते), परंतु तिच ऊर्जा जेव्हा साकार (Matter) मध्ये परिवर्तित होते तेव्हा दृश्यमान होते.

हा शिवज्योतिर्लिंग चौसष्ठी चा विचारही या विश्वब्रह्मांडात ऊर्जा रूपाने अखंड अस्तित्वात होता आणि आहे, फक्त परम सदगुरु महावतार श्री बाबाजींच्या संकल्प आणि कृपेने तो माझ्या मनात आणि देहात विचार रुपात प्रकट झाला आणि आता तो प्रकल्प स्वरूपात प्रत्यक्ष अस्तित्वात येत आहे. (Energy converts into Matter and Matter converts into Energy).

त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने धार्मिक आधारानुसार चौसष्ठ पंचसूत्री शिवलिंग एकाच शिळेवर कोरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे ज्यामुळे सर्व चौसष्ठ ज्योतिर्लिंगांच्या स्थानी असलेली दिव्य ईश्वरीय वैश्विक ऊर्जा (Infinite Divine Cosmic Energy) या एकाच ठिकाणी एकत्रित (concentrate) होऊन तेथुन ती अनेकपटीने  वृद्धिंगत होऊन विश्वकल्याणसाठी पुन्हा अंतरिक्षात (Cosmos) आणि विश्वात (Universe) प्रक्षेपित (Transmition) होईल.

हा सर्व त्या ओंकार स्वरूप दिव्य परमात्म्याचा संकल्प आहे जो पूर्ण करण्यासाठी त्याने परमगुरू महावतार श्री बाबाजी यांचे दिव्य मार्गदर्शनानुसार कार्य आरंभिले आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या आज्ञेचे पालन करत आहोत.

||ओम परम सद्गुरु महावतार श्री बाबाजी चरणार्पणम अस्तु ||

बापू पाडळकर

Posted in Uncategorized.